+A A -A
screen-reader



/

मी, माझे पद आणि मनःशांती तणावमुक्तीचा दिलखुलास कार्यक्रम

पदाचा अहंकार निर्माण होऊ देऊ नका - डॉ. संजय उपाध्ये

भूमिका बदलण्याचे भान ठेवल्यास मनःशांती मिळते - डॉ. संजय उपाध्ये

 

(मुंबई, दि. १४ नोव्हेंबर २०२४) : वाढत्या भौतिक गरजा आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आहार, विहार आणि विचार यावर काहीसा प्रतिकूल परिणाम झाला असून मुंबई सारख्या शहरात कमी वेळेत जास्त कामे करताना दगदग, मनस्ताप, चिडचिड होऊन तणाव वाढत आहे. अशा परिस्थितीत मानसिक समाधानासाठी संतुलित जीवन पद्धती, सुदृढ आरोग्य आवश्यक आहे, कारण याचा थेट परिणाम कार्यक्षमतेवर होतो. महानिर्मिती गतिमान प्रशासन मानव संसाधनाच्या माध्यमातून मनुष्यबळाच्या मानसिक समाधानाचा विचार करून दिलखुलास आणि उपयुक्त असा “मी, माझे पद आणि मनःशांती” ह्या विषयावर डॉ. संजय उपाध्ये, पुणे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रकाशगड मुख्यालय येथे केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी संचालक (प्रकल्प व इंधन) अभय हरणे, विशेष अतिथी डॉ. नितीन वाघ कार्यकारी संचालक (मानव संसाधन) प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

डॉ. संजय उपाध्ये यांनी मन:शांती ढासळण्याची विविध कारणे सांगितली, त्यात प्रमुख कारण ‘पद’ असल्याचे सांगितले. ‘पद’ हे मानवी आयुष्याचा महत्वाचा भाग असून मनःशांती ढळण्याचे प्रमुख चार ठिकाणं आहेत - घर, समाज, कार्यालय आणि निसर्ग. मन:शांती दैनंदिन कार्यावर अवलंबून असते. स्थान बदलले की पद बदलले पाहिजे. एकच भूमिका सगळीकडे घेऊन चालत नाही. भूमिका बदलता आली पाहिजे. वेष, आवेश, कर्म, बुद्धी आणि परिणाम हे सूत्र लक्षात ठेवून पदाचे भान ठेवा असेही त्यांनी सांगितले.

ज्याप्रमाणे निसर्ग बदलतो, ऋतू बदलतात आणि ऋतूप्रमाणे फुले-फळे येतात, त्याचप्रमाणे आपले जीवन सुंदर आहे, वेळेनुसार-आवश्यकतेनुसार तसेच परिस्थितीनुसार भान ठेवून ‘पद’ बदलायला हवे, तुम्ही पद मिरवायला लागले की, दु:खाला सुरुवात होते. पदाचा अहंकार निर्माण होऊ देऊ नका. पदाचा विनियोग कसा करायचा ते समजले पाहिजे. मुंबई हे शून्य अहंकाराचे शहर आहे, प्रवासी म्हणून आपल्याला कोणीही छोटा-मोठा मानत नाही. पद बाजूला ठेवून मनमोकळेपणाने जगाल तर मोठे व्हाल, असा त्यांनी विनंतीवजा सल्ला दिला.

डॉ. संजय उपाध्ये यांनी अतिशय सोप्या शब्दात, खुमासदार आणि विनोदी शैलीत तणावमुक्त जीवनाचे सूत्र सांगितले. ‘मी’ पणा, अहंकार हा ज्या शब्दातून आपल्या अंगी येतो, त्याला दूर सारून समाधानी, प्रसन्न आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे, वागण्याचे मार्मिक उदाहरणांसह त्यांनी पटवून दिले. सलग दोन तास प्रेक्षकांना हसवत त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी डॉ. नितीन वाघ यांनी आयोजनामागची भूमिका विषद केली. ते म्हणाले की, “मुंबईमध्ये दररोजची दगदग, धावपळीमुळे माणसं तणावात असतात यातून मुक्ती म्हणून सहज सोपा मार्ग मन:शांतीचा कार्यक्रम आहे. तर धकाधकीच्या जीवनात प्रसन्न आणि समाधानी राहण्यासाठी असे कार्यक्रम मोठा हातभार लावतात”, असे अभय हरणे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक विवेक रोकडे, मुख्य अभियंते राहुल नाळे, प्रसन्न कोटेचा, विजय बारंगे, विजया बोरकर, अनिल काठोये, मुख्य महाव्यवस्थापक आनंद कोंत, विश्वनाथ कुळकर्णी, हर्षल भास्करे, कंपनी सचिव राहुल दुबे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर, अग्नी सल्लागार व मुख्य अग्निशामक अधिकारी शशिकांत पापडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते तसेच महानिर्मितीचे विभाग प्रमुख, महावितरण, महापारेषणचे अधिकारी-कर्मचारी प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सोनाली चुंगडे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे मोलाचे योगदान लाभले.

Scroll